तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर; निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर
राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या २३ जिल्ह्यांमधील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात तलाठी पदाच्या चार हजार ४६६ रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली होती. यासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. तलाठी परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात घेण्यात आली होती.
महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.” असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप तसेच हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या ९ हजारांहून अधिक आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले.
त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले होते.
मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवड यादीसोबत प्रतिक्षा यादी-CLICK HERE